Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर लाचखोर पोलीस कोण?

 लाचखोर खाकीला मोठा दणका! ३ लाखांची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह हवालदाराला एसीबीने रंगेहात पकडल.

लाचखोर पोलीस






उदगीर वार्ता : खाकी वर्दीला कलंक 

लातूर जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत भ्रष्ट पोलिसांना चांगलाच दणका दिला आहे. 

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि पोलीस हवालदार राहुल नागरगोजे यांना तब्बल ४५ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. एका गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्याच्या मोबदल्यात ही मोठी मागणी करण्यात आली होती. या खळबळजनक कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.


सविस्तर घटनाक्रम असा की, तक्रारदाराचे मेव्हणे रणजित मल्हारी पाटील यांच्यावर ३१ मार्च २०२६ रोजी उदगीर ग्रामीण पोलिसात एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक न करणे आणि तपासाच्या प्रक्रियेत इतर कायदेशीर मदत करण्याच्या बदल्यात पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि हवालदार राहुल नागरगोजे यांनी तक्रारदाराकडे चक्क ३ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या अन्यायाविरोधात तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली.


त्यानंतर एसीबीने या प्रकरणाची शहानिशा करून सापळा रचला. पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार राहुल नागरगोजे याने पंचांसमक्ष तडजोडीअंती ५० हजार रुपये लाचेची मागणी निश्चित केली. त्यानुसार ठरल्याप्रमाणे उदगीर शहरातील अहमदपूर रोडवरील हॉटेल पंचवटी येथे प्रत्यक्ष पैशांची देवाणघेवाण ठरली. तिथे हवालदार राहुल नागरगोजे याने तक्रारदाराकडून ४५ हजार रुपये लाच स्वीकारली. लाच घेताच त्याने लगेचच पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांना फोन करून पैसे मिळाल्याची माहिती दिली.


नेमक्या याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबी अधिकाऱ्यांनी झडप घालत हवालदार राहुल नागरगोजे याला रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये लाचेची रक्कम ४५ हजार रुपये आणि एक मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांना थेट त्यांच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यालयातूनच ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडूनही एक मोबाईल हँडसेट मिळून आला आहे. या कारवाईनंतर दोन्ही आरोपींना थेट लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेऊन त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरांची झडती देखील घेण्याचे काम चालू आहे.


पत्रकाराचे मत:

रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांनीच भक्षकासारखे वागून खाकी वर्दीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच गुन्हेगारांना अभय देण्याचे प्रकार घडत असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा तरी कुणाकडे? अशा भ्रष्ट प्रवृत्तींवर प्रशासनाने कायमस्वरूपी व कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, लाच घेतल्यानंतर नागरगोजेने थेट निरीक्षक पुजारी यांना फोन करून “भेट झाली” अशी माहिती दिली. त्यानंतर पुजारी यांनीही फोनवरून “पाठवून द्या, मदत करता येईल” असे म्हणत लाच व्यवहाराला दुजोरा दिला. म्हणजेच, संपूर्ण व्यवहार हा संगनमताने चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


कारवाईदरम्यान आरोपींकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या घरांची झडतीही सुरू आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


🔥 जनतेचा संताप उसळला!


या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “ज्यांच्याकडे न्याय मागायला जायचं, तेच जर पैशासाठी गुन्हेगारांना वाचवत असतील, तर सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा कुणावर?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.


⚡ पोलिस खात्याची अब्रू धुळीस!


⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला सपंर्क करा..

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ