Ticker

6/recent/ticker-posts

⏰धनंजय मुंडेच्या पाचवीला पुंजलेला संघर्ष

धनंजय मुंडेंच्या पाचवीला पुजलेला संघर्ष! ...अवश्य वाचा.. गोपीनाथ मुंडे साहेब २००० सालापासून ते २०१४ पर्यंत विरोधीपक्षात राहिले.तेव्हा नेते लोकं त्यांच्या सावलीत मोठी व्हायची अन् सत्तेसाठी शरद पवारांच्या पक्षात जायची.त्यांना शरद पवार सत्तेची चव द्यायचे.सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि पंडीत घराणे त्यापैकीच.अजून महाराष्ट्रात बरेच आमदार होते जे कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये सुरुवात करायचे आणि नेता झाले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचे.त्याच मुंडे साहेबांच्या सावलीत धनंजय मुंडे वाढले. धनंजय मुंडेंनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद निवडणूकीपासून केली.पण २००९ लोकसभा निवडणूकीत गोपीनाथ मुंडे साहेबांनी बीड लोकसभेतून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केल्याने परळीतून त्यांच्या जागी धनंजय की पंकजा लढणार हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. परळीतून भाजपकडे उमेदवारीसाठी फक्त पंकजाचाच अर्ज आल्याने परळीतून भाजपची उमेदवारी आपल्या मुलीला दिल्याचे उत्तर देत मुंडे साहेबांनी घराणेशाहीचे आरोप आणि धनंजय मुंडेना उमेदवारी का दिली नाही या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर हे स्पष्ट झाले होते की गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वारस पंकजा मुंडेच असतील.त्यामुळे त्यानंतर लगेचच विधानपरिषदेवर संधी देऊनही धनंजय मुंडे यांचं मन भाजपात आणि आपल्या काकासोबत रमले नाही.त्यांनी त्यानंतर अजितदादांशी जवळीक वाढवत विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.तेव्हा मुंडे साहेबांची प्रतिक्रिया होती की "आता धनंजयला मोठ्या वटवृक्षाची सावली मिळाली आहे." अजितदादांनी दिलेला शब्द पाळत धनंजय मुंडेंना विधानपरिषदेची आमदारकी दिली.तेव्हा पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलच्या चौकात बॅनरवर धनंजय मुंडेंना शुभेच्छा देतानाचे शब्द होते,"अजितदादांचा शब्द म्हणजे काळया दगडावरची पांढरी रेघ असते" हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या कळपात अजितदादांच्या पाठिंब्यावर रमले.पण जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर २०१४ च्या लोकसभेत मोदी लाटेत राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात सुपडा साफ झाला होता.आणि विधानसभेत महाराष्ट्रात युतीचीच सत्ता येणार हे चित्र स्पष्ट झाले होते. धनंजय मुंडेंचे काका गोपीनाथ मुंडेसाहेब केंद्रात केंद्रिय ग्रामविकास मंत्रीही झाले. धनंजय राष्ट्रवादी सोडतील किंवा मुंडेसाहेब त्यांना भाजपात परत आणतील अशी आशा परळीच्या लोकांना होती पण धनंजय मुंडेंनी अजितदादांची साथ सोडली नाही.त्यातच मुंडे साहेबांचे दिल्लीत अकाली निधन झाले.आणि बीड जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी आणि गावोगावच्या शहाणथोरांनी मुंडे कुटूंब राजकारणात एकसंध व्हावे म्हणून प्रयत्न केले पण पंकजांच्या गोटातून कुठलीही तडजोड होणार नाही असा संदेश नामदेव शास्त्रींच्या तोंडून भगवानगडाच्या आदेशाच्या नावाने लोकांसमोर देण्यात आला.अशाही सहानुभूतीच्या वातावरणात धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून २०१४ च्या आधीच निकाल स्पष्ट असलेल्या निवडणूकीला सामोरे गेले.इतकी सहानुभूती असूनही पंकजांचे मताधिक्य अधोरेखित करण्यासारखे नव्हते.त्या फक्त २६५०० मतांनी निवडणूक जिंकल्या होत्या.त्यानंतर भाजपच्या नव्या फळीतील नेत्या म्हणून त्यांना वजनदार खाती मिळाली. विधानसभेत पराभूत झालेल्या धनंजय मुंडेंकडे आता खूपच कमी पर्याय होते.पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जुन्याजाणत्या नेत्यांना बाजूला सारत धनंजय मुंडेंची विधानपरिषद विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली.त्यानंतर अनेकदा पंकजांचे समर्थक मागच्या दाराने निवडून आलेला आमदार म्हणून धनंजय मुंडेंची खिल्ली उडवायचे.पण विरोधीपक्षनेते पदाची धनंजय मुंडेंची कारकिर्द इतकी गाजली की महाराष्ट्रात विधानसभेचा विरोधीपक्षनेता कोण हेही लोकांना माहिती नसताना देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात चिक्की घोटाळा,शेतकरी कर्जमाफी, राष्ट्रवादीची संघर्षयात्रा, पीकविमा घोटाळे असे अनेक घोटाळे बाहेर काढण्यात धनंजय मुंडे आघाडीवर होते.स्वतः ओबीसी असून मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात आणि सभागृहाबाहेर मांडण्यात सेनापती म्हणून तेच शब्दांना तलवारीची धार देत आघाडीवर होते. त्याचबरोबर परळीत जनसंपर्काची आणि लोकांची कामे करण्याची धनंजय मुंडेंची पद्धत परळीच्या लोकांना आवडू लागली.त्यांनी लोकांची कामे करण्यासाठी विरोधीपक्षनेतेपद व्यवस्थित वापरले. डीएमकडे गेल्यास काम होतेच किंवा काम झाले नाहीतरी डीएम आपल्यासाठी फोन तरी करतो हे प्रत्येकजण बोलू लागला.आता प्रत्येक गावातला माणूस थेट कनेक्ट झाला होता.कोण कुणाचा भाऊ, कुणाचा मेव्हणा,कुणाचा नातेवाईक हे सगळं निवडणूक गणितात वापरून धनंजय मुंडेंनी पंकजांचा २०१९ च्या विधानसभेत पराभव केला.तेव्हापासून ते आतापर्यंत परळीवर जी धनंजय मुंडेंची पकड आहे ती ढिली झाली नाही. २०१९ नंतर पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांसोबत आमदारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावरच होती असे बोलले जाते.जेव्हा आमदार अजितदादांना सोडून शरद पवारांकडे जमू लागले त्यात सगळ्यात शेवटी पोचलेले धनंजय मुंडेंच होते. अजितदादांचे बंड फसल्यानंतर त्याची शिक्षा धनंजय मुंडेंना शरद पवारांकडून होणार हे निश्चित होतेच.त्यामुळे त्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात अजितदादांच्या पुढाकाराने धनंजय मुंडेंची वर्णी भलेही लागली पण खाते तितकेसे वजनदार खाते त्यांना देण्यात आले नाही. अजितदादांनी कायमच धनंजय मुंडेंना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले.त्याचा फायदा अजितदादांना आणि त्यांच्या पक्षालाही झालाच.पण धनंजय मुंडेही प्रकाशझोतात आले.देवेंद्र फडणवीस शिंदे यांच्या नवीन प्रयोगात सामील झालेल्या अजित पवारांनी आपल्या अधिकारात धनंजय मुंडेंना कृषीमंत्रीपद देऊन मानाचे स्थान दिले.दोघेही मोठ्या नेत्यांचे पुतणे होते त्यामुळे पुतण्या असण्यामुळे वारस न होऊ शकल्याचा दाह दोघांनीही सहन केलेला होताच.पण देवेंद्र फडणवीसांच्या खेळीमुळे मुंडे घराणे पुन्हा एकदा एकत्र आले होते तर पवार कुटुंबात भेगा पडल्या होत्या.जे मुंडे साहेब असताना झाले नाही ते अजितदादांनी करून दाखवले अशा चर्चा बीड जिल्ह्यात होत्या. २०२४ लोकसभेत पंकजा भाजपकडून लोकसभा लढल्या तेव्हाच परळीतील धनंजय मुंडेंची वाट सोप्पी झाली होती.लोकसभेत पराभव झाल्यानंतर ओबीसी आंदोलनाच्या उंबरठ्यावर सामाजिक सत्तासंतुलनात पंकजांची वर्णी विधानपरिषदेवर लागली.इथे आता मागच्या दाराने झालेले आमदार या पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या टिकेचा समाचार इतिहासाने घेतला होता. त्यानंतरच्या २०२४ विधानसभेत तब्बल १ लाख ४० हजारांच्या बहुमताने धनंजय मुंडे आमदार झाले.एकूण मतांपैकी तब्बल ७६% मते त्यांनी परळीत मिळवली होती. पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांची राज्याच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली.पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच्या सहभागामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. अजितदादांनी शेवटपर्यंत धनंजय मुंडेंसाठी किल्ला लढवला पण देवेंद्र फडणवीसांच्या दिशानिर्देशामुळे त्यांना राजीनामा घ्यावा लागला. इतका संघर्ष करून जिंकून धनंजय मुंडे शेवटी साधे आमदार उरले. नगरपालिका निवडणूकीत परळी आणि गंगाखेडमध्ये राष्ट्रवादीला जिंकून दाखवत त्यांनी पुन्हा पक्षाला संदेश दिला होता.बीड पोलिस, SIT आणि तहीलयानी न्यायिक कमीशन यांच्याही कुठल्याच चौकशी अहवालात धनंजय मुंडेंचा दुरूनही सहभाग सिद्ध झाला नसल्याने त्यांना क्लीन चीट मिळालीच होती. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीनंतर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुनरागमन करतील अशा आशा पल्लवीत होत होत्या इतक्यात त्यांचे राजकिय गॉडफादर अजितदादांचे अपघाती निधन झाले.आपण दुसऱ्यांदा पोरके झालो अशी त्यांची प्रतिक्रिया होती.जेव्हा बापाचा आधार गेला तेव्हा अजितदादांनी बाप म्हणून डोक्यावर हात ठेवला अशी त्यांची भावना होती. प्रचंड गुणवत्ता, रुबाबदार बाणा, भाषण कौशल्य, सभागृहात विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची क्षमता आणि महाराष्ट्रातील युवकांशी असलेला कनेक्ट ह्या इतक्या जमेच्या बाजू असूनही वयाची पन्नाशी गाठलेल्या धनंजय मुंडेंचा संघर्ष मात्र संपत नाहीये.जे इतरांना सहज मिळतं त्यासाठी डीएमला झगडावे लागते.त्यांच्या विरोधात पेड आंदोलकांनी इतके आरोप करूनही एकही आरोप अजून सिद्ध झाला नाही.तरीही त्यांना पक्षाला माझ्याकडे कुठलीतरी जबाबदारी द्या, मला काम द्या म्हणावे लागते. आज अजितदादा पवार गेल्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचे राजकिय भविष्य अधांतरी आहे. अजितदादा पश्चात घडून येणाऱ्या राजकिय घडामोडी दूरगामी परिणाम करणाऱ्या असणार आहेत.पण या सगळ्यात आधी स्वकीयांशी, मग परकीयांशी आणि आता नशिबासोबत सुरू असलेला संघर्ष धनंजय मुंडेंच्या पाचवीलाच पुजला गेलाय असेच म्हणावे लागेल. एक अनुभवरुपी व्याख्याता (आपलाच.....)

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ