Ticker

6/recent/ticker-posts

....बाप तो बापच असतो ...

...........बाप एक विचार ...... नक्की वाचा फ्लॅटमधून उग्र वास आल्यामुळे पोलिस दार उघडतात आणि मध्ये चार दिवसांची सडलेली एका वृद्धाची बॉडी मिळते. माहिती अशी मिळते की, त्यांची दोन्ही मुलं परदेशात असतात. बायकोचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलं उच्चशिक्षित... एक दुबईत तर दुसरा कोणत्यातरी देशात नोकरीला. दोघंही तिकडेच सेटल झाले आहेत. पोलिसांनी संपर्क केल्यानंतर समजतं की, त्यांना असं इमर्जन्सीमध्ये येणं शक्य नाही... "जे काही असेल ते उरकून घ्या!" समोर ती बॉडी बघून किंवा मुलं आले नाहीत याचं अजिबात वाईट वाटलं नाही... वाईट या गोष्टीचं वाटलं की, त्या वृद्धाचा प्रवास कसा असेल? आपल्याकडे एका पिढीला चांगलं उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याआधीच्या एका पिढीला हाल सोसावे लागतात. स्वतःचं अस्तित्वच नाकारून, सगळ्या इच्छा अपेक्षा बाजूला ठेवून फक्त मुलांसाठी राबावं लागतं. तो प्रवास फार कठीण असतो... अर्थात कोणी जबरदस्ती केलेली नसते. कर्तव्य समजूनच ते सर्व काही केलेलं असतं. त्या वृद्धानेही... खरंतर वृद्ध जोडप्यानेही स्वतःचं जगणं बाजूला ठेवून, सर्व काही कर्तव्ये पार पडली असतील. प्रसंगी कर्ज काढून, काही विकून शिकवले असेल, परदेशात पाठवले असेल. आपलं आयुष्य त्यांना दिलं असेल... चार दिवस म्हातारा बाथरूममध्ये पडून होता... एकदाही त्या दोन मुलांना बापाची आठवण येऊ नये? असं म्हणतात की, म्हातारपणाची तजवीज आधीच करून ठेवली पाहिजे. सगळंच मुलांना देऊन बसू नये, थोडाफार तरी पैसा, काही जागा स्वतःच्या नावावर असावी. पैशाची तजवीज करताही येईल पण माणसांची तजवीज कशी करणार? एवढा सगळा प्रवास शेवटी, 'जे काही असेल ते उरकून घ्या' पर्यंत जात असेल तर किती वाईट आहे! डोळे झाकण्याआधी त्या वृद्धाच्या नजरेत मुलांबद्दल रागही नसावा. सडून गेलेल्या पापण्यांआड सताड उघडे असणारे डोळे अजूनही कोणीतरी येईल याची वाट पाहात होते...<

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ